वारीतील दिनक्रम :

दररोज सकाळी ४ ते ४.३० वाजता श्री माऊलींच्या पादुकांची पूजा होते. यास ‘पहाटपूजा’ असे म्हणतात. ही पूजा हल्ली संस्थान समितीकडून होते. ही पूजा सुरू असताना वारीतील वारक-यांचे स्नानआदी कर्म आटोपून, आपले तंबू व इतर सामान वाहनांत भरून मार्गस्थ होणे सुरू होते. सर्व वारकरी ५.३० ते ६.०० च्या सुमारास माऊलींच्या तंबूजवळ निघण्याच्या आदेशाची वाट पाहत उभे असतात.

यानंतर श्रीमंत शितोळे सरकार यांचा मानाचा नैवेद्य होतो. तो झाल्याशिवाय पालखी निघत नाही. नंतर श्री चोपदार यांच्या आदेशानुसार कर्णेकरी अर्ध्या तासाच्या अंतरात तीन वेळा कर्णा वाजवतात. दोन कर्णे झाल्यानंतर अश्व श्री माऊलींच्या दर्शनाला येतात व नंतर श्री चोपदार आदेश देतात त्यावेळी खांदेकरी पालखी उचलतात आणि तिसरा कर्णा होतो.

सकाळचा विसावा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा विसावा होऊन पालखी मुक्कामाचे ठिकाणी प्रवेश करते. त्यावेळी पालखीतळावर होणा-या समाजआरतीस विशेष महत्त्व आहे. समाजआरतीच्यावेळी दिंड्या वर्तुळाकार उभ्या राहतात. तंबूसमोरील मोकळ्या जागेत मधोमध पालखी ठेवली जाते. त्यासमोर श्री शितोळे सरकारांचे प्रतिनिधी, श्री हैबतबाबांचे प्रतिनिधी व श्री वासकर महाराज उभे असतात. पालखीजवळ उजव्या बाजूस श्री चोपदार व त्यासमोर मालक व चोपदार उभे असतात. सभोवताली सर्वत्र टाळमृदुंगाचा गजर सुरू असतो. श्री चोपदार आपला ‘चोप’ उंचावून ‘हो’... अशी ललकारी देतात. त्याबरोबर लाखो वारक-यांचा समुदाय आपले भजन त्वरीत थांबवतो. सर्वत्र नि:शब्द शांतता पसरते. परंतु एखाद्या दिंडीमध्ये काही विवाद्य विषय उद्भवला तर त्याच्याकडे सोहळ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती दिंडी मात्र टाळ वाजवत राहते. वारक-यांची ही शिस्त पाहिली की अंगावर रोमांच उभे राहतात. अनेक पोलिस अधिका-यांनीही हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटे घातली आहेत. हरवलेल्या अथवा सापडलेल्या वस्तूंची यादी, कोणी चुकले असल्यास त्यासंबंधी सूचना, अन्य काही सूचना त्यानंतर सांगितल्या जातात. दुस-या दिवशीची निघण्याची वेळ व कार्यक्रम सांगून झाल्यावर आरती होऊन पालखी
श्री शितोळे सरकार यांच्या तंबूत विराजमान होते. यानंतर पालखीसमोर मानाचे कीर्तन होते. या कीर्तनाची परंपरा ठरलेली असून त्या परंपरेला धरूनच आजही कीर्तनसेवा सादर केली जाते.

कीर्तनानंतर धुपारती होऊन रात्रभर श्री माऊलींच्या समोर जागराची सेवा होते.