वारीतील श्रीं चे मानकरी:

श्रीं चे पालखीचे मालक:
श्रीगुरु हैबतबाबा यांनी पालखी सोहळ्याला दिलेले स्वरूप आणि नियम आजही तेच आहेत आणि हा संपूर्ण सोहळा त्यांच्या प्रतिनिधीच्याकरवीच होतो. श्री गुरु हैबतबाबांच्या प्रतिनिधींनाच अतीव आदराने ‘मालक’ असे संबोधले जाते.

श्रीमंत शितोळे सरकार :
बेळगाव नजीकच्या अंकलीचे श्रीमंत शितोळे सरकार यांच्याच तंबूत श्री माऊलींचा रात्रीचा मुक्काम असतो. श्री माऊलींचा जरीपटका, घोडेस्वार आणि श्री माऊलींचा अश्वदेखील श्री शितोळे सरकार हेच सेवा म्हणून रुजू करतात. श्री माऊलींसाठी सकाळी ६.०० वाजता प्रसादही शितोळे सरकार यांचेकरवीच असतो. ही सर्व सेवा इ.स. १८३१ पासून आजतागायत अखंडपणे सुरू आहे. म्हणूनच वाखरी येथून पंढरीपुरी जाताना श्रींच्या पादुका श्री शितोळे सरकारांच्या गळ्यात बांधण्यात येतात. हा त्यांचा मान आहे.

श्री चोपदार:
श्रीगुरु हैबतबाबा यांनी पालखी सोहळा सुरू करण्याच्या आधीपासूनच "चोपदार" हे पद विद्यमान होते.आजमितीस माऊलींच्या चोपदारपदाचा मान श्री रंधवे कुटुंबाकडे आहे. सोहळ्यावर नियंत्रण ठेवणे, रिंगण लावणे, समाजआरतीचे वेळी दिंडीच्या तक्रारींची नोंद घेणे, याव्यतिरिक्त वर्षभर ठरवून घेतलेल्या सेवा असतातच. सध्या श्री बाळासाहेब चोपदार, श्री राजाभाऊ चोपदार, श्री उद्धव चोपदार व श्री रामभाऊ चोपदार हा मान परंपरेनुसार चालवीत आहेत. श्री तुकोबारायांच्या बीजेच्या सोहळ्यात देहू संस्थानातही श्री चोपदार यांना मान दिला जातो.

श्रीं चे पंखाधारी:
श्री माऊलींच्या तळावर पादुकांना वारा घालण्याची सेवा वाल्हे येथील श्री मांडके कुटुंबियांकडे आहे.

श्रीं चे कर्णेकरी:
सोहळ्यातील वारक-यांना सूचना देण्यासाठी पूर्वीपासून कर्णा वाजविला जात असे. हे वाद्य सुमारे २५ किलो वजनाचे असते. त्याचा आवाज दूरवर ऐकू येतो. हा मान आळंदी येथील श्री वाघमारे कुटुंबियांना गेल्या तीन पिढ्यांपासून आहे.

चवरी:
आळंदी येथील श्री कु-हाडे कुटुंबियांकडे माऊलींवर चवरी ढाळण्याचा मान आहे.

अबदागिरी:
श्री मोरू माळी आळंदीकर यांच्याकडे अबदागिरी धरण्याचा मान आहे.

श्रीं चे शिपाई:
आळंदी येथील चौधरी कुटुंबीय हे ज्ञानोबारायांचे शिपाई या नात्याने सेवा बजावतात.

श्रीं च्या रथाचे बैल:
श्रींच्या रथास जोडण्यात येणारे बैल देण्याचा मान आळंदी ग्रामस्थांना जातो. श्री. कु-हाडे, श्री. घुंडरे, श्री. रानवडे, श्री. वरखडे, श्री. वहिले, श्री. भोसले या कुटुंबांकडे हा मान आळीपाळीने असतो. यासाठी एक स्वतंत्र बैल समिती आहे.