पालखी प्रस्थान :

वारी सोहळ्याचा पहिला दिवस म्हणजे ‘प्रस्थानाचा दिवस.’ ‘प्रस्थान’ म्हणजे ‘प्रवासास निघणे’. तो दिवस म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमी. दुपारी चार वाजता श्री माऊलींचे प्रस्थान होते. एखाद्या वर्षी प्रस्थानदिवशी गुरुवार असेल तर श्री माऊलींची गुरुवारची नित्य पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर, म्हणजेच गुरुवारी रात्री अथवा शुक्रवारी पहाटे प्रस्थान करण्याचा प्रघात आहे. हा सोहळा फार वैशिष्ट्यपूर्ण असतो. देवांचे पुढील २७ आणि मागील जेवढ्या दिंड्या आत मंदिर परकोटात मावतील तेवढ्या देऊळवाड्यात मंदिराभोवती भजन करत दुपारीच उभ्या राहतात. यावेळी जोरदार भजने चालू राहतात. प्रस्थानाच्या आनंदाने सर्व वारकरी भान हरपून नाचत असतात. प्रस्थानवेळेपूर्वी श्री चोपदार श्री माऊलींचे अश्व मंदिरात घेऊन येतात आणि हे अश्व देवांना नमस्कार करतात. त्यावेळी श्रीमंत शितोळे सरकार, श्रीमंत शिंदे सरकार (ग्वाल्हेर) किंवा त्यांचे प्रतिनिधी; आणि श्रीमंत निंबाळकर सरकार (फलटण) यांना मंदिरात बोलावले जाते. श्री गुरु हैबतबाबांचे प्रतिनिधी आणि श्रीमंत शितोळे सरकार गाभा-यात जाऊन हैबतबाबांच्यावतीने आरती होते. नंतर संस्थानच्यावतीने आरती होऊन मग पादुका पालखीत ठेवल्या जातात. त्यानंतर दिंडीप्रमुखांना व मानक-यांना श्री गुरु हैबतबाबा आणि संस्थानतर्फे श्रीफल प्रसादरूपाने दिला जातो. नंतर सर्व दिंडीप्रमुख, मानकरी समाधीचे दर्शन घेतात. पुन्हा आरती होऊन पालखी मंदिराच्या बाहेर पडते. आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने पालखी खांद्यावर घेऊन नाचतात. श्रींची पालखी सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिराचा कळस हलतो. म्हणजे सिद्धेश्वर माऊलींना निरोप देतात अशी वारक-यांची श्रद्धा आहे. मंदिरास प्रदक्षिणा घालून पालखी बाहेर पडते. नगरप्रदक्षिणा होऊन पालखी श्री माऊलींचे आजोळी गांधीवाड्यात मुक्कामास येते. समाजआरतीनंतर येथे श्री गांधींतर्फे पानसुपारी घेऊन पहाटेपर्यन्त आजरेकर यांचा जागर होतो.