पंढरपूर ते आळंदी -परतीचा प्रवास :

श्री क्षेत्र पंढरपुरमध्ये एकादशीला नगरप्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान तसेच पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला झाल्यावर जाताना श्री माऊलींची आणि श्री पंढरीनाथांची भेट होते. या भेटीला सोहळ्यात पूर्वापार परंपरा नाही. ती मागील काही वर्षांपासून सुरू झाली आहे. पौर्णिमेला दुपारी ४ वाजता श्री माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. पंढरपुरातील सर्व महाराज व श्रीमंत शितोळे सरकारांचे अश्व नाक्यापर्यंत श्री माऊलीस निरोप द्यायला येतात. परतीच्या प्रवासाला सर्व दिंड्यांच्या विणेक-यांसह सर्वसाधारण एक हजार वारक-यांचा समुदाय असतो. परत येताना वारकरी हा प्रवास निम्म्या वेळातच पूर्ण करतात. परतीचा प्रवास हा आषाढ वद्य दशमीस आळंदीत संपन्न होतो. श्री माऊली स्वगृही प्रवेश करते तेव्हा ग्रामस्थ अत्यंत उत्साहाने श्री माऊलींचे स्वागत करतात. श्री चोपदार श्री माऊलींच्या मंदिरात येऊन आमंत्रण देतात.  त्यावेळी मंदिरात सुरू असणा-या कीर्तनाचेच रूपांतर दिंडीमध्ये होते आणि ही दिंडी इंद्रायणीच्या पुलापाशी येऊन थांबलेल्या श्री माऊलींना सामोरी जाते. इंद्रायणीच्या पुलावर पालखी व ग्रामस्थांची भेट होऊन पूजा व आरती होते. ‘माऊली आली, माऊली आली’ म्हणून सर्वत्र आनंद होतो. मंदिरात त्यादिवशी श्री चक्रांकितांच्या वतीने सर्वांना पिठले-भाकरीचा प्रसाद होतो.

एकादशीला नगरप्रदक्षिणा होत असतानाच हजेरी मारूती मंदिरात परतीला असणा-या सर्व दिंडीक-यांची हजेरी होऊन, त्यांना मानाचा नारळ प्रसादरूपाने दिला जातो. यावेळी मानाच्या सुमारे १५ दिंड्यांची हजेरी होते. यानंतर श्री माऊली नगरप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरात प्रवेश करते. येथे आरती होऊन, या महिन्याभरच्या आनंदसोहळ्याची साश्रू-नयनांनी सांगता होते. प्रत्येकाच्या हृदयात आता वेध लागलेले असतात पुढील वारीचे.