रिंगण :

वारी सोहळ्यातील रिंगण हा सदैव आकर्षणाचा मोठा भाग ठरतो. भजनातील अत्युच्च आनंद अनुभवण्याचा क्षण म्हणजे रिंगण. चालण्यातील शिणवठा दूर करण्याचा एक भाग म्हणजे रिंगण. रिंगणे दोन प्रकारची असतात.

(१)गोल रिंगण (२)उभे रिंगण

श्री माऊलींच्या पालखी सोहळ्यात तीन उभी रिंगणे होतात. पहिले लोणंद सोडल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे, दुसरे भंडीशेगावनंतर बाजीराव विहीर येथे व तिसरे वाखरी सोडल्यानंतर पंढरपूर येथे पादुकांजवळ. या व्यतिरिक्त पालखी सोहळ्यात चार गोल रिंगणे होतात. ती पुढीलप्रमाणे -

१)सदाशिव नगर,२)खुडूस ओढा, ३)ठाकूरबुवा, ४)वाखरी जवळील बाजीराव विहिर

रिंगणाच्या जागा व वेळही ठरवितानाचे निकष लक्षात घेतले तर असे दिसून येते की दोन रिंगणे ही रस्त्याच्या डाव्या बाजूस, दोन रिंगणे रस्त्याच्या उजव्या बाजूस, दोन जेवणापूर्वी तर दोन जेवणानंतर होतात. हा परिपाठ पूर्वापार आहे. उभे रिंगण लावताना, सर्वप्रथम अश्व रस्त्यावर उभे केल्यानंतर, श्री चोपदार दिंड्यांना रस्त्याच्या दुतर्फा ओळी करण्याच्या सूचना देतात व त्या नंतरच ओळी केल्या जातात. सर्व दिंडीवाल्यांचे आपापल्या जागेवरच खेळ सुरू होतात. त्यानंतर श्री चोपदार, श्री माऊलींच्या व स्वाराच्या अश्वाला घेऊन श्री माऊलींच्या रथाला उजवी घालून शेवटच्या दिंडीपर्यंत जातात व परत येताना अश्व श्रींचे दर्शन घेतात. अश्व पुन्हा मूळ जागेवर येईपर्यंत सर्व दिंड्यांमधून ‘माऊली’, ‘माऊली’ असा नामघोष आणि टाळांचा गजर चालू असतो. श्री चोपदारांनी रथावर उभे राहून चांदीची काठी ‘चोप’ उंचावून ‘हो’ अशी आरोळी दिल्याबरोबर क्षणार्धात सगळे टाळ थांबतात व तरडगाव येथे उडीच्या खेळात ‘तुकाराम-तुकाराम’ असे भजन होते. वाखरी येथे श्री माऊलींची आरती व पादुकांजवळ भगवान श्री पांडुरंग व श्री माऊलीची आरती होते व उभ्या रिंगणाचा सोहळा समाप्त होऊन पालखी पुढे मार्गस्थ होते.

गोल रिंगणासाठी मधोमध श्री माऊलींची पालखी, त्याभोवती पताकाधा-यांचे कडे, त्यामागे बाहेरील बाजूस तोंड करून रिंगण पाहावयास आलेले प्रेक्षक, त्यानंतर अश्वांनी प्रदक्षिणा घालण्यासाठीचा मार्ग; त्यानंतर आतील बाजूस तोंड करून रिंगण पाहावयास बसलेले प्रेक्षक व सर्वात मागे भजन व खेळ यांचा अखंड आनंद लुटत असणारे असंख्य वारकरी अशी सर्वसाधारण रचना असते. प्रत्यक्ष अश्व धावण्याच्या जागेचा मार्ग बनविण्यासाठी श्री चोपदारांना फारच परिश्रम घ्यावे लागतात. रिंगण लावल्यानंतर श्री चोपदारांच्या आदेशाने, रथापुढील दिंडी क्र. १४ (भोपळे दिंडी) मधील जरीपटकाधारक तीन प्रदक्षिणा घालतात. व नंतर भाविकांच्या ‘माऊली’, ‘माऊली’ या अखंड गजरातच अश्व तीन किंवा अधिक प्रदक्षिणा पूर्ण करतात. हे पाहून भाविकांच्या नेत्रांचे अक्षरश: पारणे फिटते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर, श्री चोपदार अश्वाला घेऊन श्री माऊलींचे दर्शन करवितात.

या रिंगण सोहळ्यानंतर होणारा ‘उडीचा कार्यक्रम’ खरोखरच अवर्णनीय असतो. श्री चोपदारांनी आमंत्रण दिल्यानंतर सर्व दिंडीकरी टाळ, मृदंग व विण्यासहित माऊलींच्या पालखीभोवती जमून तालावर भजनानंद लुटतात. त्या आनंदाचा परमोच्च क्षण उपभोगूनच पुढील कार्यक्रमाची सांगता होते.

वेळापूरपूर्वी ‘धाव्या’चा कार्यक्रम होतो. ‘धावा’ म्हणजे जेव्हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पंढरपूरास मजल-दरमजल करीत जात असत तेव्हा पंढरपूरच्या जवळ जात असतानाच आपले आराध्य दैवत श्री विठुरायांच्या भेटीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसे. पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाल्यानंतर ते धावतच पंढपुरास जात असत. म्हणून वेळापूरजवळ सर्व दिंड्या सिंचनकरितामूळ| वृक्षओलावेसकळ॥हा अभंग म्हणून त्याचे शेवटचे चरण तुकाम्हणेधावा| आहेपंढरीविसावा॥म्हणतच धावत विसाव्यापर्यंत जातात. विसाव्याजवळ शेडगे दिंडीतर्फे भारुड होते