वारीची संकल्पना

‘यात्रा’ आणि ‘वारी’ यात मुख्य फरक म्हणजे यात्रेला ठराविक कालावधी निश्चित नसतो. ती एकेकट्याने करता येते आणि तीपण विशिष्ट हेतु-निबद्ध असते. पण वारी ही निरपेक्षपणे आयुष्यभरचेच नव्हे; तर वंशाचे व्रत म्हणून अखंडपणे चालवली जाते. वारी ही अखंड चालणारी असून निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. वारी ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. श्री पांडुरंग हे एकमेव दैवत, चंद्रभागा हे तीर्थ आणि पंढरी हे क्षेत्र या पलीकडे दुसरे कोणतेही दैवत, तीर्थ व क्षेत्र हे वारक-याना शिरोधार्य नाही. वारीचे ठिकाण कधीच बदलत नाही. वारीची वेळ, तिथी सर्व पूर्वनियोजित निश्चित असते. कोणतीही जाहिरात न करता हे सर्व होत राहते. वारी ही पापक्षालनासाठी नसते. मुंडन, श्रद्धा, दान इत्यादी कोणतेही विधीविधान तिथे नसते. निरपेक्ष, निष्काम भावनेने ‘कुळाचे व्रत’ म्हणून वारी केली जाते. श्री चंद्रभागेचे स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन, हरिनाम चिंतन आणि ‘राम कृष्ण हरी’ या सांप्रदायिक बीजमंत्राचा नित्य जप, एवढेच काय ते विधी! महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील अठरापगड जातींचे सर्व थरांतील सर्व वयाचे लोक जातीभेद - वर्णभेद व वंशभेद विसरून एकत्र आलेले कोठे पाहावयाचे असतील तर ते या पंढरीच्या वारीतच!

वारकरी संप्रदायात प्रामुख्याने दोन एकादशांना आणि त्या एकादशा धरून केल्या जाणा-या वारीला महत्त्व आहे! आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या त्या दोन वा-या. त्या व्यतिरिक्त चैत्र आणि माघ वारीपण असते. महाराष्ट्रात जशी आषाढी आणि कार्तिक वारी तशी चैत्री आणि माघी ही कर्नाटकातील वारक-यांची वारी.

‘वारी’ या संकल्पेनचा हा अर्थ समजावून घेतल्यानंतर आपण आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढ वारी पालखी सोहळ्याचा तपशील जाणून घेऊ...