पालखी सोहोळ्याचे स्वरूप:

पालखी सोहळ्यात सर्वात पुढे भोई समाज दिंडी असते. त्यानंतर श्री माऊलींचा अश्व (त्यावर श्री माऊली स्वत: आरूढ असतात, ही वारकर्‍यांची भावना आहे म्हणून या अश्वाच्या कपाळाला ते आदराने स्पर्श करून नमस्कार करतात). त्या पाठोपाठ श्रीमंत शितोळे सरकार यांचा, जरी पटका हाती धारणा केलेला घोडेस्वार असतो. जरीपटक्याच्या अश्वापाठोपाठ २६ दिंड्या, त्यांच्यामागे माऊलींचा रथ, त्या मागे इतर दिंड्या अशी ही रचना असते.

पालखी:

ज्ञानोबारायांच्या चांदीच्या पादुका ठेवण्यासाठी चांदीची पालखी असते. मार्गस्थ होताना तिला श्रींच्या विशेष रथात ठेवले जाते. जरीची सुंदर अबदागिरी, जरीची रंगीत छत्री, चांदीची चवरी श्रींच्या सेवेत असते. असे हे कैवल्य साम्राज्यचक्रवर्ती श्री माऊलींचे वैभव आहे. लोकांचा हा अनभिषिक्त राजा आहे. लोकप्रजा आपणहून त्याची सेवा करतात.

दिंड्या

पालखीच्या मागे व पुढे सुमारे ४०० दिंड्या असतात. या दिंड्यांचा क्रमही श्री हैबतबाबांनी ठरवून दिल्याप्रमाणेच आजही पाळला जातो. दिंडी म्हणजे वारकर्‍यांचा एक विविक्षित समुदाय. त्यात विणेकरी, त्यापुढे टाळकरी व पखवाजवादक आणि सर्वात पुढे पताकाधारी असतात. श्री पंढरीनाथाला प्राणप्रिय असणारी पवित्र तुळशी आणि दिंडीतील वारक-यांची तहान भागविण्यासाठी पाण्याचा हंडा माथ्यावर घेतलेल्या महिला विणेक-यांच्या मागून चालतात.

श्री माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये रथापुढे अधिकृत २७ व रथामागे २०१ नोंदणीकृत दिंड्या आहेत. त्याखेरीज साधारण १०० दिंड्या या विनानोंदणीकृत आहेत. दिंड्यांचा अनुक्रम सेवेप्रमाणे ठरलेला असतो. नवीन दिंड्यांना सोहळ्यात प्रवेश करण्यापूर्वी पंचसमितीची परवानगी घ्यावी लागते. त्या दिंड्यांना रथामागे शेवटचा क्रमांक मिळतो. एका दिंडीत साधारण १०० ते १००० पर्यंत जनसमुदाय असतो. प्रस्थानाच्या वेळी साधारण दोन ते अडीच लाखांचा जनसमुदाय आळंदीत असतो. हाच समुदाय वाखरीपर्यंत सुमारे सात ते आठ लाखांवर जातो.