वारी-काही ठळक वैशिष्ट्ये :

१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.

११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.

या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.

१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.

१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.

१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.

१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.

१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.

१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.

१८)  रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.

१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते.

पृष्ठ क्र.१पृष्ठ क्र.२पृष्ठ क्र.३