वारीची व्याख्या

मार्ग दाऊनी गेले आधी | दयानिधी संत पुढे॥तेणेचि पंथे चालो जाता | न पडे गुंता कोठे काही॥

भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानाचे जागरण घडविणारा वारकरी संप्रदाय म्हणजे मराठी संस्कृतीचा मेरुदंडच जणू! तर, आषाढीची पायवारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माचा मेरुमणी. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची आत्मखूण आहे. श्री विठ्ठलाच्या भक्तांचा मेळा म्हणजे वारी. संतांना बरोबर घेऊन त्याच संतांचे अभंग गात श्री विठ्ठलाच्या भेटीस जाण्याचा वारीचा हा सोहळा आणि त्याची शतकानुशतकांची परंपरा जगात एकमेवाद्वितीयच. मराठी संस्कृती आणि प्रकृती यांचा मनोज्ञ संगम होतो या वारीत. महाराष्ट्रातील निसर्गाचे वेळापत्रक आणि वारीचे वेळापत्रक यांचा मेळ जुळविला आमच्या संतांनी. प्रपंचात राहून परमार्थ करण्याचा आचारधर्म शिकवते वारी. त्यामुळे, एखाद्या वर्षी पावसाचे आगमन पुढे-मागे झाले तर प्रस्थानाला हजेरी लावू न शकलेला वारकरी पुढच्या मुक्कामावर वारी सोहळ्यात सामील होतो. त्यामुळे काहीच बिघडत नाही. कारण वारकरी आणि श्री विठ्ठल यांचे नाते आहे निखळ प्रेमाचे. संतांच्याबरोबर श्री विठ्ठलाच्या नामचिंतनात त्या विठ्ठलाकडे केवळ प्रेमच मागण्यासाठी निघालेल्या प्रेमळ भक्तांचा मेळा म्हणजे वारी. मराठी माणसाची ‘आयडेन्टिटी’ असलेल्या या वारीसोहळ्याचा अंतर्बाह्य परिचय करून घेणे हीसुद्धा एक वारीच!

‘वारकरी’ म्हणजे ‘वारी’ करणारा. ‘वारी’ याचा अर्थ ‘येरझारा’. असा जो, येरझारा करतो तो वारकरी. ही येरझारा आपल्या गावाहून उपास्य देवतेच्या गावी असते. ती नियमाने होते. उपास्य देवता खंडोबा, भवानीआई अशा भिन्न असू शकतात; पण ‘वारकरी’ हा शब्द मात्र पंढरपुरातील श्रीविठ्ठलाची उपासना करणा-या भक्तासाठीच योजला जातो.

‘हीच व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास॥
पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी॥

असे मागणेच तुकोबारायांनी पंढरीनाथांकडे मागितलेले आहे.

वारीमागची भूमिकाही आपल्या उपास्यदेवतेकडे श्रद्धापूर्वक जाण्याची आहे. ‘काया-वाचा मन’ अशा तीनही पातळ्यांवरून केलेली ही तपश्चर्या आहे. पंढरीची सामुदायिक वारी हा वारक-याचा मुख्य आचारधर्म आहे. येथे श्री भगवान विठ्ठलपण आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत असतात.

वाट पाहे उभा भेटीची आवडी |
कृपाळू तातडी उतावीळ॥

असा तुकोबारायांचा दाखला आहे.