वारी – व्यवस्थापनशास्त्र

वारी – व्यवस्थापनशास्त्राचा आगळाच वस्तुपाठ :

१) वारीतील १८ दिवस म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे १८ अध्यायच. प्रत्येक दिवशी नवीन गावी नवीन मुक्काम. रोज रात्री लावलेला तंबू दुस-या दिवशी सकाळी काढायचा आणि परत रात्री नवीन जागी लावायचा.

२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकूण तीन जरीपटके असतात.
श्रीमंत शितोळे सरकार यांचा जरीपटका सर्वश्रुत आहेच. त्याव्यतिरिक्त रथापुढील दिंडी क्र. १४ (भोपळे दिंडी) आणि रथामागे दिंडी क्र. ११ (गोरेकर दिंडी) या दोन दिंड्यांतही प्रत्येकी एक असे दोन जरीपटके असतात. जेव्हा वारीतील समुदाय वाढायला लागला तेव्हा हे जरीपटके दिंडीक-यांना एकंदरी वारीची किंवा एकमेकांची स्थिती सांगू शकत (रथापुढील १ क्रमांकाची दिंडी १४ क्र. दिंडीचा जरीपटका पाहू शकत होती. रथामागील सर्वांत शेवटची दिंडी रथामागील ११ क्रमांकाच्या दिंडीचा जरीपटका पाहू शकते).

३) प्रत्येक दिंडीचे वारीतले स्थान ठरलेले असते. एवढेच केवळ नव्हे तर दिंडीतल्या प्रत्येक व्यक्तीचे दिंडीअंतर्गत स्थानपण ठरलेले असते.

४) प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख दिंडीकरी असतो तसेच एक विणेकरीपण असतो. कोणी जागर करावयाचा, कोणी कुठली अभंगसेवा करायची हे नियम आणि संबंधित व्यक्तीही ठरलेल्याच असतात.

५) प्रत्येक दिंडी म्हणजे व्यवस्थापनशास्त्राचे चालते-फिरते पुस्तकच जणू. दिंडीकर कधीच कोणाहीकडून काहीही घेत नाही. त्यांचे वारीचे व्यवस्थापन आपआपल्या स्थानावरून निघतानाच केले जाते. पाण्याचे टँकर, भोजनसाहित्य, आचारी, किराणासाहित्य याचे सगळे नियोजन काटेकोर ठरलेले असते.

६) मुक्कामाच्या प्रत्येक तळावरून सकाळी ६.०० च्या सुमारास पालखी हमखास निघते म्हणजे निघतेच! तोपर्यंत सर्व वारकरी नित्यकर्म आटोपून श्री माऊलींच्या निघण्याची वाट बघत असतात. हा ‘टाइम मॅनेजमेंट’चा भाग आहे.

७) सकाळी ६.०० ला सुरू झालेली चाल १०.०० ला विसाव्याला थांबते तोवर त्या त्या दिंडीची भोजनव्यवस्था झालीच असावी लागते, कारण ११.३०ला परत चाल सुरू होणार असते. हे इतके काटेकोर असते की यात कधीही कोणतीही दिंडी किंवा वारकरी भोजन वेळेवर बनू न शकल्याने उपाशी राहिल्याचे आजवर ऐकिवात नाही.

८) श्री माऊलींच्या वारी सोहळ्याची नियमावली इ.स. १८३१ पासून जी श्री गुरु हैबतबाबा यांनी ठरवून दिली ती आजही तशीच अंमलात आणली जाते.

९) कित्येक सेवेकरी श्री माउलींच्या चरणी आजही वर्षानुवर्षे सेवा अखंडितपणे रुजू करतात. त्यात खंड नाहीच. वंशपरंपरा सेवेचा अधिकार असलेल्या व्यक्तीच मानाची कीर्तनसेवा सादर करतात.

१०) श्री चोपदार यांनी चांदीचा चोप उंच उभारून ‘होऽऽऽ’ अशी ललकारी देताच लाखो वारक-यांचा समुदाय क्षणात शांत होतो. ही केवळ अजोड अशी शिस्तच नाही का?

पृष्ठ क्र.१पृष्ठ क्र.२पृष्ठ क्र.३