वारी – व्यवस्थापनशास्त्र

११) सर्व भोजनसाहित्य भरलेले प्रत्येक दिंडीतील वाहन सकाळच्या प्रस्थानाच्या वेळी सहा वाजताच रस्त्यातून मार्ग काढीत जेवणाच्या वेळेपूर्वी दुपारच्या भोजन विसाव्याच्या जागेवर पोहोचवून भोजनाची सर्व तयारी करावी लागते. विशेष म्हणजे प्रत्येक मुक्कामी उपलब्ध असलेली पाण्याची व्यवस्था पाहून हे सगळे करावे लागते.

१२) टँकरमध्ये असलेल्या उपलब्ध मोजक्या पाण्यातच सर्वांच्या आंघोळी, गरजेपुरते कपडे धुणे आणि स्वयंपाक करणे अगदी बिनबोभाट पार पडते. ही खरी तर, पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा, हे शिकवणारी गोष्ट आहे.

१३) सायंकाळी विश्रामतळावर अगदी हीच व्यवस्था पाहायला मिळेल. सकाळी उठून परत नवीन गावी बाजार खरेदी करण्याचे नियोजन रात्रीच झालेले असते. विशेष म्हणजे अगदी स्वयंपाक्यापासून तर पाणीवाटप करणा-यांपर्यंत दिंडीतील कामाचे वेळापत्रक व वाटप ठरलेले असते.

१४) दिंडीत चालणा-या वारक-यांना पाणी वाटण्यासाठी महिला सतत कार्यरत असतात. संपूर्ण वारीत त्यांचे ठरलेले काम तेच. प्रत्येक व्यक्ती आपल्याला दिलेल्या कामावरच लक्ष केंद्रित करते. विनाकारण दुस-याच्या कामात आपण ढवळाढवळ करणार नाही आणि दुस-याला आपल्या कामात करू देणार नाही.

१५) पालखी सोहळ्याचे भव्यदिव्य स्वरूप पाहाता शासनातर्फे पुरवला जाणारा पोलिस बंदोबस्त तोकडा असतो. खरेतर तो हवा असतो त्या त्या गावात दर्शनासाठी येणा-यांना शिस्तीत ठेवायला, चोरांपासून संरक्षण करायला! प्रत्यक्ष वारक-यास त्याची गरजच नाही. कारण ‘स्वयंशिस्त’ म्हणजे वारकरी, असे समीकरणच वारीत दिसते.

१६) या वारीमागे कुठलीही मोठी सरकारी यंत्रणा नाही, किंवा मोठी आर्थिक मदतही नाही. तरीपण सर्व सोहळा वर्षानुवर्षे परंपरागत पद्धतीने पार पडतो.

१७) मानापमानाच्या जाणिवा तीव्र असलेल्या आजच्या या जगात आजही या वारीचे कुठलेही निमंत्रण कोणाला दिले जात नाही. कुठलेही आग्रहाचे पत्र कोणी कोणाला पाठवत नाही पण तरीही जीवलगाची भेट म्हणून वारी व्हावी, हाच खरा नवस बोलला जातो.

१८) शौचाची अपुरी व्यवस्था, वापरायला मोजकेच पाणी, स्वयंपाक करायला गॅस/केरोसिन महागात खरेदी करणे, हे सगळे वारीत सोसावे लागते. तरीपण वारकरी हे सगळे अगदी आनंदाने सहन करतो. कदाचित जगण्याचे कुठले तरी ‘आर्ट’ वारकरी आधीच शिकलेला असतो.

१९) पुरुष-महिला सर्वच एकाच वेळी वारीत स्नान, नित्यकर्म करताना दिसतात पण कधीच त्यांच्याकडून कुठलेही गैरवर्तन झाल्याचा प्रकार दिसून येत नाही. कारण ‘सर्वाघटी राम भाव शुद्ध’ हीच भावना सगळ्यांच्या अंतर्यामी वसत असते.

२०) वारीत दर्शनाला मंत्री आला काय, कॅमेरा आला काय, कोणी फोटो काढले काय किंवा हेलिकॉप्टर वरून गेले काय, दिंडीतल्या वारकर्यांस त्यांचे काहीही नवल नसते. या सगळ्यांची नवलाई असते ती फक्त वारीत येणा-या हवशा-गवशा-नवशा पर्यटक मंडळींना!

२१) वारीचा हा सोहळा म्हणजे केवळ वाचण्याचा अथवा ऐकण्याचा प्रांत नव्हे. त्यासाठी सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन अनुभवच घ्यायला हवा.

पृष्ठ क्र.१पृष्ठ क्र.२पृष्ठ क्र.३